Orange Planting 2025 संत्रा म्हंटल म्हणजे नागपूर संत्रा आपल्या डोळ्यासमोर येतो. आंबा व केळी नंतर फळ पिकामध्ये संत्र्यांचाच नंबर लागतो. असा हा संत्रा त्याचे अवीट गोडी व मुळे पौष्ठिक गुणधर्मामुळे सर्वत मान्यताप्राप्त फळ आहे.

Orange Planting 2025 विदर्भातील नागपूर व अमरावती हे जिल्हे नागपूर संत्र्यांच्या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल प्रसिद्ध आहेत. परंतु योग्यप्रकारे लागवड व बागेचे नियोजन न केल्यामुळे बागा लवकरच खराब होण्याचे दिसून आलेले आहे. पुढे दिल्याप्रमाणे नियोजन केल्यास दर्जेदार संत्रा उत्पादन घेऊन बागा अधिक कालावधीकरिता टिकविता येतील.
राज्यातून बेदाणा निर्यातीत मोठी घट!!
जमीन: Orange Planting 2025
मध्यम काळी, सुमारे एक ते दिड मीटर खोल व त्याखाली कच्चा मुरूम असणारी, उत्तम निचऱ्याची जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्याच्यावर असू नये. अतिशय भारी व पाण्याचा अयोग्य निचरा होणाऱ्या जमिनी निवडू नयेत.
लागवड: मुख्यत्वे पावसाळ्यात चौरस पद्धतिने अंतर 6*6 मीटर (हेक्टरमध्ये 277 झाडे) खड्याचा आकार 1*1* मीटर

संत्रा घन लागवड तंत्रज्ञान: Orange Planting 2025
बागेभोवती अधिक पाण्याचा निचरा होण्याकरिता बागेभोवती एक मीटर रुंदीचा व एक मीटर खोलीचा चर तयार करावा.
गादीवाफ्यावर लागवड करावी. (गादीवाफा तीन मीटर रुंदीचा व 50 सेमी उंचीचा असावा. गादीवाफ्याची दिशा उत्तर-दक्षिण असावी.)
घन लागवड 6 मीटर 3 मीटर करावी.
गादीवाफ्यावर दुहेरी नळीचा वापर करून ठिबक सिंचन करावे.
खत व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे करावे.
छाटणी तंत्रज्ञानाचा वापर करावा.
कीड व रोग नियंत्रण वेळीच करावे.
संत्रा घन लागवड छाटणी तंत्रज्ञान: Orange Planting 2025
घन पद्धतीने लागवड केलेल्या संत्राचे आंबिया बहाराचे उत्पादनासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात 10 फूट उंचीवर बॉक्सपद्धतीने छाटणी करावी.
जाती: नागपूर संत्रा, नागपूर सीडलेस, मूदखेड (कमी बियांचा)
कलमाची निवड: कलमीकरण 20 ते 30 सेमी. उंचीवर केलेले असावे. कलमेची जाडी पेन्सिलच्या आकाराची असावी. कलमाची उंची 75 ते 100 सेमी. असावे. कलम परिपक्व असावी. कलमेच्या सालीवर पांढऱ्या रेषा असाव्यात. कलमांना भरपूर तंतुमय मुळे असावेत कलमीकरण 8 ते 9 महिन्यांपूर्वी केलेले असावे. कलम सशक्त रोगमुक्त व जातीवंत नागपूर संत्रांच्या मातृवृक्षापासून तयार केलेले असावे. कलम ही रंगपुर किंवा जंबेरी खुंटावरच बांधलेली असावी.
पाणी पुरवठा: दहा वर्षे व त्यावरील वयाच्या झाडांना दरवर्षी पाण्याच्या 28 ते 30 पाळ्या लागतात. दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे. पाणी टंचाईत 2 किंवा 4 दांड पद्धत वापरावी. शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. त्यामुळे 30 ते 40% पाण्याची बचत होते.
खत व्यवस्थापन (खताची मात्रा /झाड)
| झाडाचे वय | शेण खत (कि.) | नत्र (ग्रॅम.) | स्फुरद (ग्रॅम.) | पालाश (ग्रॅम.) |
| 1 | 5 | 120 | 60 | — |
| 2 | 10 | 240 | 120 | — |
| 3 | 15 | 360 | 180 | — |
| 4 | 20 | 480 | 240 | — |
| 5 | 25 | 600 | 300 | — |
| 6 ते 9 | 30 ते 35 | 720 ते 1000 | 360 ते 400 | — |
| 10 वर्षे व पुढे | 50 | 1000 ते 1200 | 400 | 400 ते 600 |
वरील प्रमाणे खते देताना सुरुवातीच्या 1 ते 5 वर्षेपर्यंत वाढीच्या काळात शेणखत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि रासायनिक खते तीन समान हफ्त्यात विभागात (जुलै, सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात) द्यावीत. रासायनिक खते बांगडी पद्धतीने मातीत मिसळून द्यावीत.

अंबिया बहार खत व्यवस्थापन: Orange Planting 2025
अंबिया बहराचा ताण तोडताना जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात प्रति झाड 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 ग्रॅम पालाश + 50 किलो शेणखत देण्यात यावे. नत्र हा अमोनियम सल्फेट मधून द्यावा. ही खताची मात्रा देण्याकरिता अमोनियम सल्फेट 2.5 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 2.5 किलो + म्युरेट पोटॅश 5 किलो प्रति झाड द्यावे.
रसायनिक खताची दुसरी मात्रा 600 ग्रॅम (2.5 किलो अमोनियम सल्फेट) प्रती झाड मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा फळे वाटण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावीत.
संत्रा बहार खत व्यवस्थापन:
संत्रा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता शिफारसीत मात्रा 50 शेणखत + 1200 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 ग्रॅम पालाश प्रति झाड यासह 500 ग्रॅम व्हॅम + 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू + 100 ग्रॅम ऍझोस्पिरिलम + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे खते देताना शेणखत + नत्राची अर्धी मात्रा + स्फुरद व पालाश ची पूर्ण मात्रा तसेच जिवाणू खते व संवर्धने शेणखत सोबत मिसळून बहरासाठी पाण्याचा ताण तोडतांना देण्यात यावीत नत्राची शिल्लक अर्धी मात्रा फळे वाटण्या एवढी झाल्यावर देण्यात यावी.
किंवा
संत्रा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता शिफारशीत मात्रा 50 किलो शेणखत + 7.5 किलो निंबोळी ढेप + 800 ग्रॅम नत्र + 300 ग्रॅम स्फुरद + 600 ग्रॅम पालाश प्रति झाड यासह 500 ग्रॅम व्हॅम + 100 ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू + 100 ग्रॅम ऍझोस्पिरिलम + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. खते देताना, शेणखत + निंबोळी ढेप + नत्राची अर्धी मात्रा + स्फुरद व पालाश ची पूर्ण मात्रा तसेच जिवाणू खते व संवर्धने शेणखता सोबत मिसळून बहरासाठी पाण्याचा ताण देण्यात यावीत. नत्राची शिल्लक अर्धी मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर देण्यात यावीत.
सूक्ष्म अन्नद्रव्ये: Orange Planting 2025
विदर्भातील बहुतांशी संत्रा बागांमध्ये जस्ताची कमतरता आहे. रासायनिक खतासोबत जस्त सल्फेट 200 ग्रॅम + बोरॅक्स 250 ग्रॅम मातीत मिसळून द्यावे. ही खते फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास जस्त सल्फेट 0.5+ टक्के लोह सल्फेट 0.5 टक्के + बोरॉन 0.1 % च्या फवारण्या आंबिया फळाकरिता जुलै, ऑगस्ट आणि मृगाच्या फळाकरीता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये द्याव्यात.
वळण व छाटणी:
लहान वयाच्या झाडांना एक खोड पद्धतीने वाढवावे व त्यानुसार वळण द्यावे. मोठ्या झाडावरील साल दरवर्षी फळे उतरविल्यावर काढावी पानसोट नेहमी काढावेत. साल काढल्यावर कापलेल्या भागावर बोर्डोमलम लावावा.
अंतर पिके: Orange Planting 2025
सुरुवातीचे तीन-चार वर्षे (फळधारणा होण्यापूर्वी) आंतरपीक घ्यावे. पहिले वर्षी ठेंगणी, कमी कालावधीची भाजीपाला हिरवळीची किंवा कडधान्याची पिके द्यावीत. पुढे हिरवळीचे पीक द्यावे. निंदण किंवा योग्य ताणनाशक वापरून आळे स्वच्छ ठेवावेत. ज्वारी, कपाशीचे आंतरपीक घेऊ नये.
बहार नियोजन: बहार धरण्यासाठी मृग/आंबिया फुलोरापूर्वी जमिनीच्या मगदूराप्रमाणे झाडाचे वय व ताकद पाहून ताण द्यावा.
मृग बहार: Orange Planting 2025
हलक्या जमिनीमध्ये 30 ते 40 दिवस, तर भारी जमिनीमध्ये 50 ते 60 दिवसाच्या (25 एप्रिल ते 15 जून) ताणाची गरज असते. ताणाच्या कालावधीत पाऊस आल्यास लगेच 1000 पीपीएम सायकोसीलचे (1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
आंबिया बहार:
या बहराकरिता 15 डिसेंबर पासून 15 जानेवारीपर्यंत पाण्याचा ताण द्यावा दोन फवारण्या सायकोसील 100 पीपीएम (1 ग्रॅम प्रति लिटर पाणी) च्या देण्यात याव्यात ताण तोडतेवेळी शिफारशीतप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी.
विरळणी: Orange Planting 2025
उत्तम प्रतीची फळे मिळण्याकरिता प्रति झाडास 700 ते 900 फळे ठेवावीत. फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर विरळणी करावी. हि विरळणी इथेपॉन 600 पीपीएम संजीवकाची (600 मिलिग्रॅम प्रति लिटर पाण्यात) फवारणी करावी किंवा हाताने फळे तोडून टाकावी.
फळगळ: Orange Planting 2025
आंबिया बहरातील फळांची गळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. ती कमी करण्यासाठी या काळात प्रत्येक महिन्यात एनएए 10 पीपीएम (10 मिलिग्रॅम संजीवक प्रति लिटर पाणी) अधिक युरिया 1 टक्का (10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) या तीव्रतेच्या संजीवकाचा फवारा द्यावा.
खोडाला मलम लावणे: जून व ऑक्टोबरमध्ये झाडाला 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डोमिश्रण (1:1:10) लावावा.
हंगाम:
आंबिया बहार : फुलोरा जाने-फेब्रु व काढणी : नोव्हेंबर-डिसेंबर.
मृग बहार: फुलोरा : जून- जुलै व काढणी : फेब्रुवारी-मार्च.
काढणी:
फळधारणेपासून फळे तयार होण्यास 200 ते 240 दिवस लागतात. आंबिया बहाराची फळे ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये तर मृग बहाराची फळे मार्च-एप्रिल मध्ये तयार होतात. फळांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर नारंगी रंग येतो. सालीवर चकाकी येऊन तेलग्रंथी स्पष्ट दिसू लागतात. तोडणीपूर्वी कार्बेन्डाझिम 0.1 चे (10 ग्रॅम + 10 लिटर पाणी) दोन फवारे 15 दिवसाच्या अंतराने देण्यात यावेत. त्यामुळे फळे साठवणुकीत टिकतात.
उत्पादन: 5 ते 8 वर्षे, संत्रा- 150 ते 400 फळे, 9 वर्षे व पुढे संत्रा 800 ते 1000 फळे
संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनर्जीवन:
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (पाऊस सुरु होण्यापूर्वी) झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात मध्यम व मोठ्या वाळलेल्या फांद्या अरीने कापून काढाव्यात. हिरव्या फांद्या सुद्धा शेंड्यापासून 45 से.मी. लांबीच्या छाटाव्यात.
छाटणी केल्यानंतर झाडावर कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
झाडाच्या बुंध्याला व छाटलेल्या जागी बोर्डोमिश्रण (1:1:10) लावावा.
छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत + 7.5 किलो निंबोळीची ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी.
ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी 500 ग्रॅम नत्र + 500 ग्रॅम स्फुरद द्यावे.
पुढील वर्षांपासून शिफारसीनुसार खताच्या मात्रा देऊन कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनर्जीवन / झाडांची छाटणी एकदाच करावी. (दरवर्षी करू नये.)
संत्र्याच्या जुन्या (15 वर्षाच्यावर वय असलेले) झाडांची छाटणी करावी. (नवीन झाडांची छाटणी करू नये.)
निर्यातक्षम संतराव उत्पादन तंत्र:
फळधारणेपासून ते तोडणीपर्यंत कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची योग्य वेळी योग्य प्रमाणातच फवारणी करावी.
गरजे पेक्षा जास्त 1500 ते 2000 फळे एका झाडावर घेऊ नये. विरळणी करून शेवटी 700 ते 1000 फळे घेण्यात यावेत.
नत्र, स्फुरद, पालाश, शेणखत, व निंबोळी ढेप इ. योग्य वेळी योग्य प्रमाणातच द्यावे.
संत्रा बागेत कपाशी, गहू, ज्वारी ही आंतरपीके घेऊ नयेत.
फळे तोडण्याच्या 10 ते 15 दिवस आधी पाणी देणे बंद करावे.
तोडणीपूर्वी कार्बेन्डाझिम 1 टक्केच्या 10 ग्रॅम+ 10 लिटर पाणी 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने करावेत.

संत्रा फळे निर्यातीची प्रमाणके:
संत्र्याचा रंग कमीत कमी अर्ध्या भागावर पिवळसर नारंगी असावा.
फळे बट्टीदार, गोल परंतु तोटी असलेली नसावीत.
फळांवर कोणत्याही किडीचे तसेच रोगाचे डाग, चट्टे नसावेत.
फळांमध्ये कमीत कमी बिया असाव्यात.
फळांमध्ये 40 ते 50 टक्के रस असावा शर्करा व आम्लाचे प्रमाण 13 ते 15 असावे.
फळांचा व्यास कमीत कमी 6.5 सेमी असावा.
पोला झालेली संत्रा फळे अयोग्य असतात.
फळांचा स्पर्श मऊ असावा व साल खरखरीत असू नये.
संत्रा फळ गळीचे कारणे:
नैसर्गिक गळ:
- फेब्रुवारी महिन्यात फळ धारणा झाल्या नंतर तापमानात एकदम झालेली वाढ
- दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक
- आवश्यकतेपेक्षा जास्त झालेली फळधारणा/ फुलधारणा व यातील स्पर्धा
किडीमुळे होणारी गळ : ऑगस्ट महिन्याचा रस शोषण करणाऱ्या पतंगाद्वारे डंख मारल्यामुळे होणारे गळ
रोगामुळे होणारे गळ: जुलै-ऑक्टोबर महिन्यात मृग बहराच्या फळाची गळ फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होते तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात Clletotricum या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे देठाजवळ डाग पडून फळगळ होते.
संत्रा आंबिया बहार/मृग बहाराची फळे झाडाला टिकवण्याकरिता उपाय योजना:
फुलाच्या पाकळ्या गळाल्यानंतर (फळधारणा झाल्यावर) कार्बेन्डिझम 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
फळे वाटण्यापेक्षा छोटी असताना एनएए किंवा जीए 10 पीपीएम युरिया 1 टक्के कार्बेन्डिझम 0.1 टक्के द्रावण तयार करून फवारणी करावी.
फळे वाटाण्याएवढी झाल्यावर नत्राची राहिलेली अर्धी मात्रा 600 ग्रॅम नत्र प्रति झाड देण्यात यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची नियोजन करण्यात यावे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
आळ्यामध्ये पाणी साचू देऊ नये अथवा पाण्याचा ताण पडू देऊ नये.
उष्णतामान वाढल्यास बागेत स्प्रिंक्लर्स सुरु करा.
रोगाचे नियंत्रणाकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% किंवा कार्बेनडीझम 0.1 टक्के एक महिन्याचे अंतराने जुलै पासून तीन फवारण्या कराव्यात.
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे नियंत्रणाकरिता निंबोळी अर्क 5% 1500 पीपीएम ची फवारणी करावी.
फळधारणा होण्याच्या कालावधीत मागेची खोड मशागत करू नये.
उन्हाळ्यातील फळगळ कमी करण्याकरिता बागेत अच्छादन करावे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |
00000000